यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस; नेरमध्ये १०९ तर यवतमाळ ६३

यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस; नेरमध्ये १०९ तर यवतमाळ ६३
Published on
Updated on
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : महिनाभराच्या विलंबाने यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण भरल्यानंतर आता बेंबळा प्रकल्पातही पाण्याची आवक वाढल्याने आज गुरुवारी सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
यवतमाळसह नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून नेरमध्ये अतिवृष्टी झाली. तेथे १०९ मिमी पाऊस कोसळला आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरल्याने बळीराजा पेरणीला लागला आहे. जिल्ह्यातील साधारण: ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहेत. मंगळवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अनेक भागांत रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १०९ मिमी पाऊस नेर तालुक्यात झाला असून, त्यापाठोपाठ ६३.५ मिमी पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात झाली आहे. बाभूळगाव, कळंब, दारव्हासह मारेगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विविध ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे बेंबळा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून आज गुरुवारी सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन वक्र दरवाजे उघडून २५ सेमी इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. तसेच अडाण धरणाचे २ दरवाजे ५ से.मी. विसर्ग ( ९.९. कमेक्स ) ने उघडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेर तालुक्यातील शेतपिकांची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाकडून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नेर तालुक्यातील सिरसगाव मंडळमध्ये एकून ११४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांनी दिलासा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news