नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना राज्यातील हत्ती पाठोपाठ वाघ आणि बिबट्यांनाही गुजरातला पाठविण्यात येत आहे. नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील चार वाघ आणि चार बिबट तडकाफडकी मंजुरीची प्रक्रिया पार पाडत शनिवार २१ जानेवारी रोजी गुजरातला रवाना झाले. त्यामुळे वन्यप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी गोरेवाडा प्रकल्पातून दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी पाठविण्यात आले. मात्र, हे वाघ गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्यात आल्याचे उघड झाले आहे. जामनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पात आल्याची माहिती आता समोर आली आहे. वाघ आणि बिबटे आठच दिवसात गुजरातला पाठविण्यात आल्याने वन्यप्रेमींतून नाराजीचा सूर निघत आहे.
वाघ नेण्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र, ही परवानगी न घेता गुजरातमधील खासगी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गोरेवाडा प्रशासनाच्या रेस्क्यू सेंटरकडे वाघ, बिबट्यांची मागणी केली होती. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राज्य सरकार आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालयाची परवानगी नसल्याने वाघ देण्यास नकार दिला होता.
यानंतर जामनगर येथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना निरोप दिला. त्यानंतर सूत्रे हलताच तीनच दिवसांत केंद्रीय प्राणी संग्रहालयासह राज्यशासन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानग्या मिळविण्यात आल्या. त्यानंतर गोरेवाडा प्रशासनाने वन्यप्राणी देण्यास होकार दिला. यानंतर चार वाघ आणि चार बिबट गुजरातकडे रवाना झाले.
हेही वाचा :