

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते नवेगाव-बांध मार्गावर कनेरी गाव शिवारात सोमवार (दि.१६ ) सायंकाळच्या सुमारास एका भरधाव ट्रकने एकापाठोपाठ एक तीन बैलगाड्यांना जोरदार धडक दिल्याने दोन बैल जागीच ठार झाले. तर चार बैल व तीन बैलगाडी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. भूपेंद्र दोनोडे (वय ३१), हेतराम मेंढे (वय ४१), डुडेश्वर हेमणे (वय २५, तिघेही रा. राका, ता. सडक, अर्जुनी) असे जखमी बैलगाडी चालकाचे नाव आहे.
भूपेंद्र व त्याचे सहकारी घरगुती कामासाठी बैलगाडीने नदीतून वाळू उपसा करून एका मागे एक या प्रमाणे कोहमारा ते नवेगाव- बांध मुख्य मार्गाने राका येथे जात असताना कनेरी गावाजवळ कोहमाराकडून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक (सी.जी.०८ ए. एक्स. ३२२२) च्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने, ट्रकची तिन्ही बैलगाड्यांना मागेहून जबर धडक बसली. यात दोन बैल जागीच ठार झाले. तर उर्वरित बैल व बैलगाडी चालक गंभीररित्या जखमी झाले.
धडक इतकी जोरदार होती की, तिन्ही बैलगाड्या रस्त्याच्या कडेवर दूरवर फेकल्या गेल्या. यात बैलगाड्यांची मोडतोड होऊन नुकसान झाले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी गंभीर जखमी बैलगाडी चालकांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. व घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक चालकावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गुणवंत कठाने करीत आहे.