.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गोंदिया : गेल्या महिनाभरात तीन अस्वलांचा अपघाती मृत्यू झाला असताना आता वाघांवर मृत्यू झडप घालत आहे. मालगाडीच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि. १२) गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे.
जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झाली असून मृत वाघिणीसह महिन्याभरात घडलेल्या तीन घटनांमध्ये चार वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्ग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून जात असून रेल्वेगाडीच्या धडकेत आतापर्यंत अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. सोमवारी सकाळी गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर वडसा व गोंदिया वन विभागाच्या सीमेजवळ वडसा वन विभागातील गांधीनगर जवळील कक्ष क्रमांक ९७ मध्ये मालवाहक रेल्वेगाडीच्या धडकेत वयस्क मादी वाघिणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार गोंदिया, अनिल दशरे NTCA, RRT गडचिरोली, RRT नवेगाव व वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून क्षेत्राची पाहणी केली आणि वाघाला शवविच्छेदणासाठी हलविण्यात आले.
गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर अनेकदा अपघाताच्या घटना घडत असून यात वन्यप्राण्यांना नाहक जीव गमवावा लागतो. या रेल्वे लाईनवर सवेंदनशील क्षेत्रात प्रतिबंधात्मक (मिटिगेशन मेजर्स) तातडीने करणे गरजेचे असल्याचे वन्यजीव प्रेमींचे म्हणने आहे.