

गोंदिया: तालुक्यातील सावरी/ लोधीटोला येथे दुर्गा विसर्जनाकरीता गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार १२ ऑक्टोबर रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. आशिष फागुलाल दमाहे ( वय २१), अंकेश फागुलाल दमाहे (वय १९), यश गंगाधर हिरापुरे (वय १९) अशी मृत युवकांची नावे आहेत.
सावरी / लोधीटोला येथे शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुर्गामाताच्या मुर्तीचे गावातील तलावावर विसर्जन करण्यात आले. यावेळी, तिघेही युवक विसर्जनासाठी गेले असता, मुर्ती विसर्जन करतेवेळी तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती निवारण शोध बचाव पथक घटनास्थळ गाठून शोध मोहिम राबविण्यात आली.
दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास तिन्ही युवकांचे मृतदेह शोधून तलावाबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे दमाहे व हिरापूरे कुटुबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी रात्रीला मृतक युवकांच्या घरी जात कुटुंबियांचे सात्वन केले.