

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : घिवारी येथे वाढदिवसाचा जल्लोष करताना मुलाने तलवारीने केक कापला तर त्याच्या वडिलांनी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली. ही घटना मंगळवारी (दि.17) रात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी बापलेकांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.. जितेंद्र तेजलाल येडे (वय. २८), माजी सैनिक तेजलाल गोपीचंद येडे (वय.५७ ) दोघेही राहणार घिवारी व लोकेश झमरु खरे (वय २३ रा. किन्ही) असे संशयित आरोपींचे नाव आहे.
या घटनेबाबत अशी कि, संशयितामधील जितेंद्र याचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सदर व्हिडिओची पडताळणी केली. यामध्ये जितेंद्र आणि तेजलाल दोघेही व्हिडीओमध्ये जल्लोष करताना निदर्शनास आले. यावर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी तिन्ही आरोपींनी हातात तलवार व बंदूक घेऊन जल्लोष साजरा केले असल्याचे कबूल केले. दरम्यान, तिन्ही आरोपींच्या विरोधात रावनवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपी तेजलाल गोपीचंद येडे हे माजी सैनिक असून त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु त्यांनी २०११ पासून त्या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे दिसून आले.