

छठ पूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी व होणारा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून गोंदिया ते छपरादरम्यान 'छठ पूजा स्पेशलʼ विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष रेल्वेगाडी दोन फेरीत धावणार असून यात ४ सामान्य व १० स्लीपर कोचसह २० बोगींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छठ पूजेदरम्यान गोंदिया रेल्वेस्थानकावरून अनेक प्रवासी प्रवास करीत असून प्रवाशांना त्रास होऊ नये, गर्दीच्या काळात प्रवाशांना कन्फर्म बर्थ/सीट उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वेगाडी क्रमांक ०८८९५/०८८९६ ही रेल्वेगाडी गोंदिया मार्गे बिलासपुर, कटनी व प्रयागराज मार्गे छपरा धावणार आहे. या रेल्वेगाडीत ४ सामान्य, १० स्लीपर कोच तर २ एसी थ्री टायर, २ एसी टू टायर व २ एसएलआर असे २० बोगी देण्यात आल्या आहेत. यानुसार ३ व ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०८८९५ गोंदिया-छपरा छठ पुजा स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार असून दुसर्या दिवशी सायंकाळी ७ वाजता छपरा स्थानकावर पोहचेल. तर रेल्वेगाडी क्रमांक ०८८९६ छपरा-गोंदिया ही रेल्वेगाडी ४ व ५ नोव्हेंबर रोजी छपरा स्थानकावरून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सोडण्यात येणार असून दुसर्या दिवशी रात्री १०:३० वाजता गोंदिया रेल्वेस्थानक गाठणार आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०८८९५/०८८९६ गोंदिया ते छपरादरम्यान धावणार असून या रेल्वेमार्गावरील गोंदियासह डोंगरगढ, राजनांदगाव, दुर्ग, रायपुर, भाटापारा, उसलापुर, पेंड्रारोड, अनूनपुर, शहडोल, उमरिया, कटनी, मैहर, सतना, मानिकपुरी, शंकरगढ, प्रयागराज, बनारस, गाजीपुर सिटी, बलिया, छपरा या रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना या रेल्वेगाडीचा लाभ होणार आहे.