
गोंदिया : विधानसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली असली तरी युती-आघाडीतील घटक पक्षात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच गोंदिया मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक सामुहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे ही जागा काँग्रेसच्या वाट्यालाच येणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून ठामपणे सांगितले जात आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात सध्यातरी महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. असे असताना राज्यात महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातही युती-आघाडीचे तिकीट वाटपाचे घोडे अडून आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. अशावेळी शिवसेना उबाठाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघात शिवसेनेलाच तिकीट देण्याची मागणी करत तिकीट न मिळाल्यास सामुहिक राजीनामा देण्याचे सुतोवाच केले आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात मागील २००९ व २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी विजय मिळवला होता. त्यातच गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली असताना अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. तर त्यापूर्वीच शिवसेना पक्षातून दोनदा आमदार असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी देखील भाजपला जय महाराष्ट्र करत शिवसेना उबाठात घरवापसी केली होती. तेव्हा गोंदिया मतदारसंघातील आघाडीचे तिकीट उबाठाला मिळणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, काही दिवसांनंतर गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्षात घरवापसीमुळे शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षात जागा वाटपाला घेऊन रस्सीखेच सुरू झाली. विशेष म्हणजे, गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळी घेतलेल्या पत्र परिषदेतून गोंदियाची जागा काँग्रेसला सुटणार, असे सांगत शिवसेना उबाठा कमकुवत असल्याचे बोलले होते. यावेळी गोंदियातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेतून गोपालदास अग्रवाल यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवून निषेध नोंदवला होता. त्यातच, पुन्हा या विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसकडून उमेदवारीची दावेदारी केली जात असताना शिवसेना उबाठा गटानेदेखील या विधानसभा क्षेत्रासाठी आपला दावा ठोकला आहे.
यासंदर्भात शिवसेना उबाठा गटाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांच्या सांगण्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. मात्र, काँग्रेसचे खासदार निवडून आल्यानंतर एकदाही त्यांनी शिवसेना कार्यालयाला भेट दिली नाही. मागील पाच वर्षात शिवसेना उबाठा गटाने महाविकास आघाडीला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. आजघडीला क्षेत्रात उबाठाचे चांगले कार्य चर्चेत आहेत. त्यामुळे गोंदिया मतदारसंघात उबाठा उमेदवाराला तिकीट मिळावे, अशी मागणी उबाठा गटाने केली आहे. तर उबाठाला तिकीट न मिळाल्यास महाविकास आघाडीचा धर्म न पाळता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा निर्णय घेऊ, असे तुळसकर यांनी प्रसार माध्यमावर सांगितले आहे. त्यामुळे गोंदिया मतदारसंघात जागा वाटपावरून महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच असून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.