

गोंदिया : पुढारी वृत्तसेवा
बदलापूर, अकोला येथील घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना व संपूर्ण राज्यभर या घटनेचे निषेध नोंदविण्यात येत असताना गोंदिया जिल्ह्यातही शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने एका अल्पवयीन (१६ वर्षीय) विद्यार्थीनीच्या घरी जात तिच्याशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून त्या शिक्षकाला अटक केली आहे. उमेश टीकाराम मेश्राम (वय ५० रा. मेंढा ता. तिरोडा जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
पीडित विद्यार्थीनी इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. संशयीत आरोपी उमेश मेश्राम हा याच शाळेत वर्ग ५ वी ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवितो. घटनेच्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी पीडिता ही शाळेला सुट्टी झाल्यानंतर घरी आल्यावर घरी खुर्चीवर बसली असता आरोपी उमेशही तिच्या घरी येऊन बेडवर बसला. यावेळी एकांतवास पाहून उमेशने पीडितेशी अश्लील चाळे केले. तर एवढ्यावरच न थांबता त्याने पीडिता नकार देत असताना तिचे केस ओढून, आपल्या मोबाईलवरील अश्लील फोटो व चित्रफीत दाखवली.
दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला व तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षक उमेश मेश्राम याच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात तिरोडा पोलीस करीत आहेत.
तिरोडा पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून संशयित आरोपी शिक्षक उमेश मेश्राम याला ३० ऑगस्ट रोजी अटक केली. तर ३१ ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने शिक्षकाला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून, त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
संशयित आरोपी शिक्षक उमेश मेश्राम गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत तिरोडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. दरम्यान, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याचे कळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या आदेशानुसार जि.प. शिक्षण विभागाने तत्काळ प्रभावाने संशयित आरोपी शिक्षक उमेश मेश्राम याला निलंबित केले आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार शाळा सुटल्यानंतर ती घरी गेली असता शिक्षक उमेश मेश्राम याने तिच्या घरी जात तिचा विनयभंग केला. या प्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सुरू आहे.
- साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा