गोदियाहून आता थेट तिरुपती विमानसेवा, शुक्रवारपासून होणार सुरुवात

file photo
file photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन इंडिगो कंपनीने उद्या 1 डिसेंबरपासून गोंदिया-हैदराबाद-तिरुपती विमानसेवेला प्रारंभ होत आहे. यासाठीची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रवाशांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. या विमानतळावरून इंटरनॅशनल व डोमेस्टिक अशा 200 जागी जाण्याचा फायदा लवकरच मिळणार आहे.

इंडिगो कंपनीने पहिल्या टप्प्यात गोंदिया-हैदराबाद-तिरुपती अशी प्रवासी वाहतूक सेवा बिरसी विमानतळावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवाशांना थेट हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेता येणार आहे. विशेष म्हणजे वैदर्भीय यात्रेकरूंना गोंदिया येथून तिरुपतीला जाण्यासाठी विमान बदलण्याची गरज नसून बिरसी विमानतळावरून हैदराबादला जाणारे हेच विमान पुढे तिरुपतीला जाणार आहे. त्यामुळे तिरुपतीला देवदर्शनाकरिता जाणाऱ्या प्रवाशांसाठी ते खूपच सोयीचे होणार आहे. शुक्रवार (दि. १) दुपारी 12:30 मिनिटांनी बिरसी विमानतळावरून इंडिगोचे विमान हैदराबाद आणि पुढे तिरुपतीसाठी उड्डाण घेणार आहे. यासाठी अनेक प्रवाशांनी तिकीट सुद्धा बुक केले आहे. बिरसी येथून प्रवासी वाहतूक सेवा होत असून बिरसी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक सोयीसुविधा व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या विमानसेवेचा लाभ मध्य प्रदेश येथील कान्हा अभयारण्य पाहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचंबरोबर या परिसरातील नागरिकांना हैदराबाद येथील विमानतळाची कनेक्टिव्हिटी मिळणार असून देश-विदेशात जाण्याकरता गोंदियावरून जाणारे विमान महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे इंडिगो ही विमानसेवा रोज देणार असल्याची माहिती एस. यु. शाह, विमान प्राधिकरण अधिकारी गोंदिया यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news