

गोंदिया : पवनीधाबे येथील पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र येथे कर्तव्यावर असतानाच पोलिस हवालदाराने स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी १.१५ वाजता घडली. जयराम कारू पोरेटी (वय ५०, रा. शंभूटोला गटग्रामपंचायत मिसीपिर्री, ता. देवरी) असे मृताचे नाव आहे.
पवनीधाबे येथील पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र येथे जयराम पोरेटी यांची गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत ड्युटी होती. ते ड्युटीवर हजरही झाले. कर्तव्यावर असतानाच त्यांनी स्वतःच्या एकेएम ४७ सर्विस रायफलने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविले. ते वर्षभरापासून पवनीधाबे पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र येथे कार्यरत होते. त्यांनी गोळी झाडून का घेतली, याचे कारण कळू शकले नाही. या घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक योगिता चाफले करत आहेत.