गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मासुलकसा घाट येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने गस्तीवर असलेल्या महामार्ग पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.3) घडली. मनीष बहेलिया असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर कोहमारा ते देवरीदरम्यान मासुलकसा घाट परिसरात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी लागत असून वाहतूक खोळंबत असते. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग पोलीस डुग्गीपारचे पोलीस पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पेट्रोलिंगवर असताना मासुलकसा घाट परिसरात जाम लागल्याची माहिती मिळाली.
यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे, पोलीस कर्मचारी योगेश बनोटे आणि मनीष बहेलिया वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वाहन क्रमांक (एमएच 12 आरटी 9625) ने घाट परिसरात गेले. यावेळी लोखंडी पाईप घेऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक (सीजी 08 एके 1402) च्या चालकाचा ताबा सुटल्याने वाहन भरधाव वेगात चालवून पोलीस वाहनावर जोरात आपटले. यामध्ये वाहनाच्या एका भागाचा चक्काचूर होऊन मागे बसलेले मनीष बहेलिया गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच बहलिया यांना उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मनीष बहेलिया यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाच्या कामाला मंजूरी मिळाली असून एका खासगी कंत्राटदार कंपनीला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. दरम्यान, शशीकरण देवस्थान व मासुलकसा घाट परिसरात उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे, मात्र, संबंधित कंत्राटदार कंपनीकडून सदर बांधकाम संथगतीने केले जात असल्याने नेहमी दोन्ही ठिकाणी जाम लागून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असतात, परिणामी अपघाताच्या घटनेत वाढ झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच आजच्या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेला असतानाच मृतांच्या यादीत भर पडली आहे.