

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव तालुक्यातील मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात तपासणी नाक्यावर भारत निवडणूक आयोगाच्या एफएसटी व एसएसटी पथकाने संयुक्त कारवाई करून वाहतूक होत असेलेला ३ कोटी ९२ लाख रूपयांचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई शनिवार (दि. १९) रोजी करण्यात आली.
आचारसहिंता लागताच आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील आमगाव तालुक्यातील मध्यप्रदेश राज्यातील लांजी मार्गावर सीमावर्ती भागात तपासणी नाका उभारण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी एफएसटी आणि एसएसटी पथक यांनी वाहन क्रमांक सीजी ०४ एन २८७६ या वाहनाला थांबवून पाहणी केली असता वाहनातून अंदाजे ३ कोटी ९१ लाख रूपये किमतीचे ७८९२ ग्रॅम सोने आढळून आले. दरम्यान, आमगावचे तहसीलदार व स्थानिक ठाणेदार यांच्या समक्ष सोने जप्त करण्यात आले. मुद्देमालाचा आमगाव पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या प्रकरणी ESMS मध्ये तक्रार पुढील कारवाई भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे. वाहतूक करण्यात येत असलेला सोने एका व्यवसायिकाचे असल्याची माहिती मिळत असून आमगाव- लांजी मार्गे छत्तीसगड राज्यातून मध्यप्रदेश राज्यात घेऊन जात असल्याची माहिती मिळत आहे.