

पणजी : पुढारी वृत्तसेवा दहावीनंतर करिअरचा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने करायला हवा, स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार ध्येय निश्चित करा आणि ते प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करा. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यानी आपले ध्येय ठरवावे. अन् ते प्राप्त करण्यासाठी विविध माध्यमातून प्रशिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे. पारंपरिक वाटांपेक्षा नव्या वाटा निवडा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शुक्रवारी रोजगार व कामगार खात्यातर्फे आयोजित करिअर परिषद (कॉन्क्लेव्ह) चे उद्घाटन केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते. यावेळी रोजगार व कामगार खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात, या खात्याचे सचिव संदीप जॅकीस, कामगार खात्याचे आयुक्त राजेश आजगावकर व इतर अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आता परीक्षा सुरू होणार आहेत, त्यामुळे दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार व कामगार खात्यातर्फे मान्यवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. दिवसभराच्या या परिषदेत देशभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतील. ते लक्ष देऊन ऐकावे, काही शंका असतील तर त्यांना विचाराव्यात आणि शंकांचे निरसन करून घ्या आणि करिअर योग्य दिशेने न्या, असे डॉ. सावंत म्हणाले.
पूर्वी फक्त डॉक्टर, इंजिनिअर होण्याकडे युवांचे लक्ष होते. आताच्या काळात डिजिटल मीडिया, रोबोटिक, एव्हिएशन आदी अनेक क्षेत्रे आहेत, जेथे विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात. त्यासाठी कौशल्य शिक्षणाला करिअरमध्ये महत्त्व असल्यामुळे कौशल्य शिक्षण प्रत्येकाने घ्यावे, असेही डॉ. सावंत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारत जगात तिसरी शक्ती म्हणून उदयाला आली आहे. त्यामुळे नोकरदार न होता नोकरी देणारे होण्याचे लक्ष समोर ठेवून त्या दिशेने आपले काम सुरू करावे. रोजगार व कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही विद्यार्थ्यांनी करिअर योग्य घडवण्यासाठी योग्य क्षेत्र निवडावे, अन् त्या दिशेने प्रयत्न सुरू करावेत, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उद्घाटन सत्रानंतर देशभरातून आलेल्या अनेक मान्यवर मार्गदर्शकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी बाबत मार्गदर्शन केले.
देश घडविण्यात योगदान द्यावे
गोवा सरकारने राज्यात आणि नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था सुरुवात केलेल्या आहेत, त्याचा लाभ घ्या. विकसित गोवा २०४७ व आत्मनिर्भर भारत २०४७ चा विचार करून प्रत्येकाने राज्य आणि देशाच्या जडणघडणीत आपले योगदान द्यावे. सरकारने स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. मुख्यमंत्री रोजगार योजना, पुढील शिक्षणासाठीची बिनव्याजी कर्ज योजना आदी योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वप्न साकार करावे, असे डॉ. सावंत म्हणाले.