

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी सिंचन आणि अर्थमंत्री तसेच माजी खासदार महादेवराव शिवणकर यांचे आज सोमवारी (दि.२०) वृद्धापकाळाने निधन झाले. आमगाव येथे सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, ते ८५ वर्षांचे होते.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. राज्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात विजय आणि संजय ही दोन मुले तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. मंगळवारी (दि.21ऑक्टो.) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मंगळवारी (दि.२१ ऑक्टो) अंत्यसंस्कार
प्रा. शिवणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२१ ऑक्टोबर) सकाळी १०.०० वाजता साकरीटोला घाट, सालेकसा रोड, आमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.
सिंचन, जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान
प्रोफेसर म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या महादेवराव शिवणकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर कृषी आणि जलसिंचन क्षेत्रात मोठे कार्य केले. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी गोंदिया जिल्ह्यात कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प उभे करून शेतकरी विकासाला हातभार लावला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा तयार करण्यात त्यांचे योगदान अमूल्य होते. गोंदिया जिल्हा निर्मितीचे ते खरे शिल्पकार मानले जातात.
संसदेत केली होती 'भारतरत्न'ची मागणी
राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या प्रा. शिवणकर यांनी २००४ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यावर संसदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी सर्वप्रथम केली होती.
प्रदीर्घ राजकीय वाटचाल
७ एप्रिल १९४० रोजी आमगाव येथे जन्मलेले प्रा. शिवणकर (एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. इतिहास) यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रदीर्घ आणि यशस्वी राहिला. १९७८ ते २००८ पर्यंत निवडणुकीत त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या आणि विदर्भाच्या विकासाला दिशा देणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ते १९७८ ते १९८९ (तीन वेळा) आणि १९९४ ते २००४ (दोन वेळा) आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
त्यांनी १९८९ ते १९९४ आणि २००४ ते २००८ या काळात चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणूनही काम केले.
१९९९ ते २००४ या काळात त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पाटबंधारे, वित्त व नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली.
१९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.