

गोंदिया : गोवंशीय जनावरांना ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या दोन आरोपींसह एका अल्पवयीन बालकाला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने नाकाबंदी कारवाई करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज, शुक्रवार ( दि. २५) पहाटेच्या सुमारास आमगाव येथील तहसील कार्यालयासमोर देवरी मार्गावर करण्यात आली. या प्रकरणी १३ गोवंशीय जनावरे व पिकअप वाहन असा ७.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रुपेश लेकचंद लांजेवार ( वय २५ रा. बाजार वार्ड लाखनी, ता. लाखनी, जि. भंडारा), सतीश सोमाजी झिंगरे ( रा. घाटबोरी ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यासह आमगाव तालुक्यातील एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने व पथक आमगाव तालुक्यात रात्रगस्तीवर असताना त्यांना काही लोक पिकअप वाहनातून देवरी मार्गे नागपूरकडे कत्तलखान्यात गोवंश जनावरे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
तहसील कार्यालयासमोर नाकाबंदी कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी (एमएच ३६ ए ए २७४६) या वाहनाला थांबवले असता वाहनात १३ गोवंशीय जनावरे चारापाण्याची सोय न करता निर्दयतेने कोंबून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी पिकअप वाहन चालक रुपेश लांजेवार याचेसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील ६ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन व प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे १ लाख ९५ हजार किमतीचे १३ गोवंशीय जनावरे असा एकूण ७ लाख ९५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.