

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : घर बांधकामाच्या ठिकाणाहून सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेट्स चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद करून १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील वाजपेयी वॉर्ड येथील फिर्यादी रामकुमार चौरागडे यांचे शहराला लागून असलेल्या फुलचुर येथे जलाराम मंदिर जवळ घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, स्लॅबचे बांधकाम करण्याकरीता बांधकाम ठिकाणी सेंट्रिगच्या ४० नग लोखंडी प्लेट्स ठेवल्या असता त्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस पथक गुन्ह्याचा समांतर तपास, गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल, व चोरट्यांचा शोध करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे पथकाने आरोपी आतीष शंकर राहांगडाले ( वय ३०), मोहित प्यारेलाल बोपचे ( वय २०) दोघेही राहणार छोटा गोंदिया व पवन ऊर्फ बंटी प्रभु उके (वय २५ रा. गोविंदपुर), कैलास संजय चौधरी (वय ३५ रा. फुलचूर, गोंदिया) या चौघांना ताब्यात घेवून जेरबंद केले.
चौघांनाही गुन्ह्यांत चोरीस गेलेला मुद्देमालाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगून कबुली दिली. दरम्यान, त्यांचे ताब्यातून गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या संपुर्ण १९ हजार रुपये किमतीचे ४० नग लोखंडी सेंट्रिग प्लेट्स व ९० हजार रुपयांची गुन्ह्यांत वापरलेले एक मोटार सायकल असा १ लक्ष ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. चारही आरोपींना गुन्ह्याचा तपास पुढील कायदेशीर प्रक्रिया कारवाईसाठी गोंदिया ग्रामीण पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.