गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र अवकाळीच्या धारा; विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी | पुढारी

गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र अवकाळीच्या धारा; विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट असून जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली. त्यात आज (ता. 19) सायंकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन काही काळापर्यंत विस्कळीत झाले होते. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट पडल्याचीही माहिती असून या अवकाळी पावसामुळे गहू व मका पिकाला फटका बसला आहे.
हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले असताना दिवसभर कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात होत कही भागात पावसाच्या सरी तर काही भागात तुरळक पावसाची नोंद करण्यात येत आहे. दरम्यान, आज, सायंकाळी गोंदिया शहरासह जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गारपीट पडल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेषतः देवरी शहरातील आठवडी बाजार असल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तर या पावसामुळे जिल्ह्यातील गहू व मका पिकाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऊन-सावल्यांचा खेळ सुरु असतानाच ढगाळ वातावरणामुळे आंबा फळासह भाजीपाला पिकाला फटका बसत आहे.

Back to top button