गोंदिया : वृद्ध विधवेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप | पुढारी

गोंदिया : वृद्ध विधवेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : दवनीवाडा येथील विधवा वृद्ध महिलेवर जबरी बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य करणार्‍या आरोपीला गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. आज 14 मार्च रोजी न्यायामूर्ती एन.बी. लवटे यांनी हा निर्णय दिला. राहुल ठाकरे (24) असे शिक्षा झालेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.
गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा येथील 65 वर्षीय विधवा वृद्ध महिला 5 डिसेंबर 2022 रोजी शेत शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. दरम्यान, सदर आरोपीने बळजबरीने तिच्यावर दोन ते तीनदा अतिप्रसंग केले एवढेच नव्हेतर अनैसर्गिक कृत्य करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दवनीवाडा पोलिस ठाण्यात पिडीताच्या तक्रारीवरून आरोपी राहुल ठाकरेच्या विरोधात कलम 376(2), 324, 341, 506 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत आरोपी राहुल ठाकरेला अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करून तत्कालीन तपासी अधिकार्‍यांनी सबळ साक्ष, पुरावे, भौतिक दुवे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणात सहा. संचालक आणि सरकारी वकिल सतिश यु. घोडे यांनी आरोपीच्या वकिलासोबत उत्तमरित्या युुक्तीवाद करून सरकार पक्षाकडून बाजु मांडली. न्यायालयाने सर्व साक्ष व पुरावे तपासून आरोपीला या प्रकरणात दोषी ठरविले. या प्रकरणाचा आज न्यायामूर्ती एन.बी.लवटे यांनी निर्वाळा देत आरोपी नराधमाला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि. राहुल पाटील यांनी केले होते. पोलिसांकडून आकाश मेश्राम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

अशी सुनावली शिक्षा…

दवनीवाडा पोलिसांनी आरोपी राहुल ठाकरे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. दरम्यान न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी न्यायालयाच्या पटलावर आलेले प्रकरण अवघ्या तीन महिन्यात निकाली काढत आरोप राहुल यास कलम 376 (2) भादवि अन्वये आजन्म कारावास व 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम 324 भादवि अन्वये 1 वर्षाचा कारावास व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम 341 भादवि अन्वये 1 महिन्याचा कारावास व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवसाचा अतिरिक्त कारावास, कलम 506 अन्वये 2 वर्षाचा कारावास 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

Back to top button