गोंदिया : जिल्हास्तरीय पशुुपक्षी प्रदर्शनीकडे पशुुपालकांची पाठ; ढिसाळ नियोजनाचा फटका | पुढारी

गोंदिया : जिल्हास्तरीय पशुुपक्षी प्रदर्शनीकडे पशुुपालकांची पाठ; ढिसाळ नियोजनाचा फटका

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्यावीने 28 व 29 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील अदासी येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे याकरीता अंदाजे 14 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याचे बोलले जात असून 14 लाखाच्या या पशुपक्षी प्रदर्शनाकडे मात्र पशुपालकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र बघावयास मिळाले. सोबतच जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षापासून उपाध्यक्ष व इतर सभापतींनीही या प्रदर्शनीकडे जाण्याचे टाळल्याचे बोलले जात असून या प्रकारामुळे पशुपालक व शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत 28 व 29 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय पशू पक्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता त्यासाठी साडेतीन लााख रुपये खर्चून उभारलेला मंडपात मात्र अवघ्या 250 च्या जवळपासच पशुपक्षींची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे, तालुकास्तरावरील पशुपशी प्रदर्शनीचा आढावा घेतल्यास 500 च्यावर पशुपक्षींची नोंद होत असताना जिल्हास्तरावरील आयोजनात केवळ अडीचशे पशू पक्षीची नोंद करण्यात आल्याने संबंधित विभागाचे ढिसाळ नियोजन दिसून आले. तर या प्रदर्शनातून जिल्हा वार्षिक योजनेचा निधी म्हणजे मार्च एंडीगच्या नावे शासकीय निधीची उधळपट्टी असाच कार्यक्रम ठरला. या स्पर्धेमध्ये पाहिजे तशी चुरसच निर्माण होऊ शकली नाही. विशेषतः जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील पशुपालकांच्या उत्कृष्ट जनावरांचा देखावा व पुरस्कार, पशुसंवर्धन विभागामार्फत विविध तांत्रिक बाबींचे मॉडेल्सव्दारे प्रदर्शन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी पशुप्रदर्शनीचे वैशिष्ट राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पशुपक्षी प्रदर्शनीचा आढावा घेतल्यावर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे ढिसाळ नियोजनामुळे अर्जुनी मोरगाव, देवरी, सालेकसा सारख्या तालुक्यातील पशुपालक आपले पशुपक्षी याठिकाणी घेऊनच आले नसल्याचे पहावयास मिळाले. त्यातच पहिल्यादिवशी जे पशुपालक उपस्थित होते त्यांचीही मोठी गैरसोय झाल्याचे अनेकांनी सांगितले. तर आज 29 फेब्रुवारीला सुध्दा कार्यक्रमाच्या उद्घाटनवेळेपर्यंतही पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे पशुपालक शेतकर्‍यांनी सांगितले.

Back to top button