

गोंदिया : नात्यात भाची लागणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपी नराधम मामाला गोंदियाच्या प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.२१) २० वर्षे सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तौसिफ शेख (वय २३, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नराधम मामाचे नाव आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत आरोपी तौसिफ शेख ईसाख शेख हा नात्यात पिडीत चिमूकलीचा मामा लागत असून घटनेच्या दिवशी १५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पिडीत चिमुकली ही अंगणवाडीतून घरी परत आल्यानंतर तौसिफच्या घरी गेली. यावेळी आरोपी तौसिफ हा आंघोळ करित होता. दरम्यान, ती त्याच्या जवळ गेली असता त्याने तिला आंघोळ करून देण्याच्या नावावर तिच्या अंगावरील कपडे काढून आंघोळ घातली. दरम्यान तिच्या गुप्तांगाला स्पर्श करत लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीने या बद्दल जर कोणाला सांगितले तर पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, तिची आई दुपारी शेतातून घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार व तिच्या मामाने दिलेल्या धमकीविषयी आपल्या आईला सांगितले. यावरून पिडितेच्या आईने १७ सप्टेंबर २०२२ रोजी केशोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द तकार दाखल केली होती. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक संदिप इंगळे यांनी करून आरोपीविरूध्द विशेष न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पिडित पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वसंतकुमार चुटे व कृष्णा डी. पारधी यांनी एकुण ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले. आरोपीचे वकील व पिडितेतर्फे सरकारी वकील वसंतकुमार चुटे यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी तौसिफ शेख ईसाख शेख (वय २३, रा. ता अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया) यास २० वर्षाचा सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक गणेश वनारे यांचे देखरेखीत, पोलीस पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई पुनम ठाकरे पोलीस ठाणे केशोरी यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.
न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या दंडाचे एकुण रकमेपैकी पिडितेला ११ हजार रुपये मदत देण्याचे आदेशित केले असून सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश ही निकाल देतेवेळी पारित केले आहे.