

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील कुंदा खुशाल मेश्राम (६३) या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज (दि.२) दुपारी ४ वाजता घडली. यामुळे ऐन धान कापणी व मळणीच्या हंगामात शेतकरी भयभीत झाले आहेत.
कुंदा मेश्राम ह्या सकाळी ११ वाजता आपल्या शेतावर गेल्या होत्या. दुपारी त्यांचा नातू किसन हा त्यांना घरी घेऊन आणण्यासाठी शेतावर गेला असता त्या तेथे आढळून आल्या नाहीत. त्यानंतर किसनने घरी येऊन आई आणि काही लोकांना घेऊन शेता नजीकच्या परिसरात शोध घेतला असता शेतापासून काही अंतरावर कुंदा मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पतीचे आधीच निधन झाले असून, त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी कुंदा मेश्राम यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाने मेश्राम यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी अमोल मारकवार यांनी केली आहे. यापूर्वीही वाघाच्या हल्ल्यात निष्पात महिलांचा जीव गेला असून, वनविभागाने तत्काळ वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अमोल मारकवार यांनी दिला आहे.
यापूर्वी २० नोव्हेंबरला इंजेवारी परिसरातील देऊळगाव बुटी येथील मुक्ताबाई नेवारे व अनुसया वाघ यांना वाघाने ठार केले होते. त्यानंतर १२ दिवसांतच ही दुसरी घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सध्या धान कापणी व मळणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जावे लागत आहे. मात्र, वाघाचे -हल्ले वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाणे दुरापास्त झाले आहे.