

Vegetable-Selling Sisters Defrauded of ₹48 Lakhs by Impostors Posing as Bank Employees
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा बँकेत खाते उघडून देण्याच्या नावाखाली एका महाठगाने गडचिरोलीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन बहिणींची तब्बल ४८ लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिथुन प्रभाकर गायकवाड, रा. खेडेगाव, ता. कुरखेडा यास अटक केली आहे.
पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले की, जुली मारोती शिरपूरकर (३५) व सविता पोहनकर या दोघी बहिणी गडचिरोलीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. संशयित आरोपी मिथुन गायकवाड हा एका खासगी बँकेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. तो दोन्ही बहिणींकडे गेला. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघींच्याही नावाने त्याने एचडीएफसी आणि एक्सिस बँकेत खाते उघडून दिले. त्यात दोघींनीही व्यवसायातून जमा केलेली रक्कम भरली. मात्र, खात्याचे सर्व नियंत्रण मिथुनने आपल्याकडेच ठेवले.
हाच फायदा घेत तो दोन्ही बहिणींना भुलथापा देत होता. अशातच मिथुनने दोघींना कुठलीही माहिती न देता त्यांच्या खात्यातून २८ लाख ५४ हजार रुपये काढून घेतले. एवढेच नाही तर त्यांच्या परवानगीविना ८ लाख रुपये आणि ऑनलाईन स्वरुपात ११ लाख ८३ हजार ७८७ रुपयेदेखील त्याने वापरले.
अशाप्रकारे एकूण ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपयांनी मिथुन गायकवाडने दोन्ही बहिणींची फसवणूक केली. मिथुन हा पूर्वी एचडीएफसी बँकेत कार्यरत होता. तेथून काढल्यानंतर तो अॅक्सिस बँकेत रुजू झाला. परंतु तेथूनही नोकरी गेल्यानंतर सध्या तो कुरखेडा येथील एका पतसंस्थेचा अभिकर्ता म्हणून कार्यरत होता, अशी माहिती आहे.
संशय आल्याने झाला भंडाफोड
आपल्या खात्यातून रक्कम गायब होत असल्याचे लक्षात येताच दोन्ही बहिणींना संशय आला. त्यांनी मिथुनला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे संशय आणखी बळावला आणि जुली शिरपूरकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संशयित आरोपीस अटक
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वातील चमूने आरोपी मिथुन गायकवाड यास अटक केली. त्याला शुक्रवारी (ता.२४) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.