गिरीधरनंतर दुसरा झटका: दोन सेक्शन कमांडर नक्षली महिलांचे आत्मसमर्पण

दोन सेक्शन कमांडर नक्षली महिलांचे आत्मसमर्पण
Gadchiroli News
गिरीधरनंतर दुसरा झटका: दोन सेक्शन कमांडर नक्षली महिलांचे आत्मसमर्पणZarina Narote Manisha Uike

गडचिरोली : कंपनी क्रमांक १० च्या सेक्शन कमांडर असलेल्या दोन जहाल नक्षली महिलांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. बाली उर्फ रामबत्ती उर्फ झरिना नरोटे ( वय २८) आणि शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनिषा उईके अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत. पाच दिवसांपूर्वी दंडकारण्याच्या स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गिरीधरने पत्नीसह आत्मसमर्पण केल्यानंतर आता दोन सेक्शन कमांडर पदावर असलेल्या नक्षली महिलांनीही शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळीला धक्का बसला आहे.

बाली उर्फ झरिना नरोटे ही एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील रहिवासी आहे. बाली ही २०१० मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. त्यानंतर अहेरी दलममध्ये तिची बदली झाली. २०१६ मध्ये तिची कंपनी क्रमांक १० मध्ये बदली झाली. २०२१ मध्ये ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून आजतागायत कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १०, जाळपोळ आणि अपहरणाचा प्रत्येकी १ आणि इतर ९ अशा २१ गुन्ह्यांची नोंद आहे.

शशिकला उईके धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील रहिवासी आहे. ही २०११ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. २०१३ मध्ये कंपनी क्रमांक ४ मध्ये तिची बदली झाली. २०२१ मध्ये तिची कंपनी क्रमांक १० मध्ये बदली करण्यात आली. २०२३ मध्ये ती प्लाटून पार्टी कमिटी व एरिया कमिटी सदस्य झाली. दलममध्ये कार्यरत असून, तिच्यावर ६ चकमकी व २ इतर अशा ८ गुन्ह्यांची नोद आहे.

दोघींवर प्रत्येकी ८ लाख असे एकूण १६ लाख रुपयांचे बक्षीस होते. २०२२ पासून आतापर्यंत १९ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करुन स्वाभिमानाचे जीवन जगावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news