लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बघून दलित, मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नाही, तर नरेंद्र मोदींचा विरोध म्हणून कौल दिला. परंतु विधानसभा निवडणुकीत दोन्ही समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नाही, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांनी गडचिरोलीमध्ये गुरुवारी (दि.22) पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. यावेळी पक्षाचे नेते अमित ठाकरे, प्रवक्ते तथा नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे, सतनामसिंह गुलाटी, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्रीकांत माने उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत कुणाला कौल मिळेल, हे आताच सांगता येणार नाही. सध्या विविध पक्षांमध्ये प्रचंड सरमिसळ झाल्याने मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. परंतु मनसे इतर पक्षातून आलेल्यांना थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ. आम्ही विदर्भातील बहुतांश जागा ताकदीने लढू,असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील मनसेमध्ये लवकरंच संघटनात्मक मोठे फेरबदल होतील. अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करुन, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, जेव्हा अमित निवडणूक लढेल तर गुपचूप लढणार नाही, असेही ते म्हणाले.