Naxalite arrest: NIA वाँटेड नक्षलवादी 'महाका'ला तिरकामेटाच्या जंगलातून अटक

naxal operations update: जाळपोळ व भूसुरुंग स्फोटासारख्या हिंसक कारवायांमध्ये देखील 'या' नक्षलवाद्याचा सहभाग होता
Naxalite arrest
Naxalite arrest
Published on
Updated on

गडचिरोली : एका खुनाच्या गुन्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला वाँटेड असलेल्या आणि जाळपोळ व भूसुरुंग स्फोटासारख्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या जहाल नक्षल्यास पोलिसांनी भामरागड तालुक्यातील तिरकामेटाच्या जंगलातून अटक केली. शंकर भिमा महाका (वय-३२, रा.परायणार, ता.भामरागड) असे अटकेतील नक्षल्याचे नाव असून, तो भामरागड दलमचा सदस्य होता.

१३ सप्टेंबरला विशेष अभियान पथकाचे जवान ताडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिरकामेटा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. त्यांना एक संशयित व्यक्ती दिसताच त्यास ताब्यात घेऊन अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात आणले. चौकशीअंती तो शंकर महाका असून, भामरागड दलमचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने तो तिरकामेटाच्या जंगलात रेकी करण्यासाठी गेला होता, असेही चौकशीत आढळून आले.

२१ जानेवारी २०२२ रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज-इरपणार मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावरील २ कोटी रुपये किमतीच्या १९ वाहनांची जाळपोळ नक्षल्यांनी केली होती. याप्रकरणी लाहेरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शंकर महाकाला अटक करण्यात आली. शंकर महाका हा २०१६ पासून २०२२ पर्यंत नक्षल्यांच्या जनमिलिशियामध्ये कार्यरत होता. त्यानंतर तो भामरागड दलमचा सदस्य झाला. जानेवारी २०२२ पासून आजतागायत पोलिसांनी १०९ नक्षल्यांना अटक केली आहे.

नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल,पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक(अभियान) एम.रमेश,अपर पोलिस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

दिनेश गावडेच्या खुनात NIAचा वाँटेड आरोपी

लाहेरी येथील दिनेश पुसू गावडे या युवकाची १५ नोव्हेंबर २०२३ रोजी नक्षल्यांनी पेनगुंडा येथे धारदार शस्त्राने हत्या केली होती. याप्रकरणी धोडराज पोलिसांनी डोबा वड्डे, रवी पल्लो, सत्तू महाका व कोमटी महाका यांना अटक केली होती. पुढे ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकेडे गेल्यानंतर त्यांनी चार जणांवर विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच गुन्ह्यात आज अटक केलेला नक्षली शंकर भिमा महाका हा एनआयएला वाँटेड होता,असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news