

Nagpur Umred Road Accident
गडचिरोली : येथील आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे-पोरेड्डीवार (वय ५४) यांचे रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगावजवळ कार अपघातात निधन झाले.
गीता हिंगे ह्या पती सुशील हिंगे यांच्यासमवेत काल नागपूरला गेल्या होत्या. रात्री कारने ते गडचिरोलीला परत येत होते. सुशील हिंगे हे चालकाच्या बाजूला बसले होते, तर गीता ह्या मागच्या सीटवर टेकून झोपल्या होत्या. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पाचगावकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने रस्ता दुभाजक ओलांकडून हिंगे यांच्या कारला मागील सीटच्या बाजूने धडक दिली. यात गीता हिंगे यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पती सुशील हिंगे व चालकास किरकोळ दुखापत झाली. धडक देणाऱ्या कारमध्ये आमदारपुत्रासह काही युवक होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत होते, अशी चर्चा आहे. पाचगाव पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
आज दुपारी ३ वाजता गीता हिंगे यांचे पार्थिव गडचिरोलीत आणल्यानंतर शहरातील शेकडो स्त्री-पुरुषांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली. सध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर कठाणी नदीच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय
गीता हिंगे काही वर्षांपूर्वी आधार विश्व फाउंडेशनची स्थापना केली. कोरोना काळात या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह गीता यांनी कोविडग्रस्तांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पोहचविण्यापासून, तर कोविडमुळे मृत्यू झालेल्या निराधार नागरिकांवर स्वत:च्या जिवाची भीती न बाळगता अंत्यसंस्कार केले. आदिवासी भागातील महिलांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. सामाजिक कार्याबरोबरच त्या राजकारणातही सक्रिय होत्या. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. त्यानंतर त्या जिल्हा महासचिव झाल्या. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीदरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांनी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.