

गडचिरोली: अधिनस्थ कर्मचाऱ्याचे रोखलेले पुरवणी पगार देयक काढण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल गुन्हा दाखल केला. डॉ.संभाजी भोकरे(३६) असे लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कर्मचाऱ्याचे फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ आणि नोव्हेंबर महिन्याचे १४ दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल काढावयाचे होते. त्यासाठी कार्यालयप्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी संभाजी भोकरे यांच्या स्वाक्षरीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. ते देण्यासाठी डॉ.भोकरे याने १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती तो १ लाख ३० रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता डॉ.भोकरे याने १ लाख ३० हजार रुपयांची सुस्पष्ट मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉ.संभाजी भोकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दिवार, हवालदार राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजाळकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.