

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील नक्षलप्रभावित मरकनार येथील गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामसभेत नक्षल्यांना गावबंदीचा ठराव मंजूर केला. पोलिस विभाग विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत असून, त्यातूनच हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे दिसून आले.
मरकनार हे गाव भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असून, अबुझमाड परिसराच्या जवळ असल्याने पूर्वी नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र, पोलिसांनी "दादालोरा खिडकी" या उपक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि विकासाशी निगडित अनेक योजना राबवल्या. तसेच, यंदा १६ जुलै रोजी पोलिसांच्या पुढाकाराने परिवहन महामंडळाच्या सहकार्याने अहेरी–मरकनार बससेवा सुरू झाली. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आणि गावकऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला.
याच पार्श्वभूमीवर काल मरकनार येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेला अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि पोलिस दल सदैव गावकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी एकमुखाने नक्षल गावबंदीचा ठराव पारित केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांकडे एक भरमार बंदूकही स्वाधीन केली.
दरम्यान, यावर्षी ९ फेब्रुवारीला पोलिसांच्या ग्रामसभेदरम्यान सुमारे ५० ते ६० नागरिकांनी नक्षल्यांविरोधात गावबंदीचा ठराव घेतला होता. आता अधिकृत ग्रामसभेत ठराव झाल्याने नक्षल्यांना गावात प्रवेश करणे अधिक कठीण होणार आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, कोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप गवळी आणि त्यांचे सहकारी सतत प्रयत्नशील आहेत.