महाराष्ट्राला मद्यनीति आणि तंबाखूमुक्तीची गरज: डॉ.अभय बंग

Dr. Abhay Bang | यशवंतराव चव्हाण राष्‍ट्रीय पुरस्‍काराने बंग यांचा सन्मान
Dr. Abhay Bang
राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या हस्‍ते डॉ. अभय बंग यांना पुरस्‍कार प्रदान करण्यात आला. Pudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली: जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. त्यामुळे लोकांना आरोग्य सक्षम करणे हे शासन आणि समाजाचे प्राधान्य असले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राला मद्यनीति आणि तंबाखूमुक्तीची तातडीने गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यक क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. अभय बंग यांनी केले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आदिवासी भागात आरोग्यविषयक कार्य केल्याबद्दल सन २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार बंग दांपत्यास प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ५ लाख रुपये, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ.बंग पुढे म्हणाले, अत्यंत शालीन, सुसंस्कृत आणि उत्कृष्ट प्रशासक असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार आम्हाला दिला जातोय, याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो. ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, समाजसेवेची प्रेरणा घेतली; त्या महात्मा गांधी फाउंडेशनला त्यांच्या बूक डेपोच्या कार्यासाठी हा पुरस्कार अर्पण करीत असल्याचे डॉ.बंग म्हणाले. गडचिरोलीच्या आदिवासी भागात कामाला सुरुवात करताना अनेक प्रश्न उभे राहिले. लोकांनी प्रश्न दिले आणि त्यावर संशोधन करत गेलो. तेव्हा आदिवासी समाजाचे आरोग्य सुधारण्याचे उपाय सापडले. याचे श्रेय आमचे नसून ते परिस्थिती आणि गडचिरोलीच्या आदिवासी लोकांचे आहे. दारूबंदीची मागणी जनतेमधून आली आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

गडचिरोली जिल्ह्यात विपूल खनिज संपत्ती असल्याने तेथे येऊ घातलेला स्टील प्लॅन्ट व त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा त्यांनी उहापोह केला. आदिवासींच्या हिताचं रक्षण करून विकास व्हायला हवा, असं प्रतिपादन त्यांनी केले.

विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीने बंग दाम्पत्याची पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कारासंबंधीची माहिती दिली. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांचे न्यूमोनिया, बालमृत्यू संदर्भात केलेल्या संशोधनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे सांगून डॉ. काकोडकर यांनी डॉ. बंग पती-पत्नी यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचा यशस्वी विस्तार केला, आदिवासी महिलांचे आरोग्य, नवजात बालकांची काळजी आणि समुपदेशन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार म्हणाले की, बंग दांपत्य आणि त्यांनी स्थापन केलेली ‘सर्च’ संस्था यांचं कार्य कौतुकास्पद आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावीत भागात राहून जनतेला आरोग्याची सेवा पुरविणे याची चव्हाण सेंटरने नोंद घेतली, याचा मला आनंद आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाजसेवेचा वसा डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग पुढे नेत आहेत, त्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य आहे. या डॉक्टर द्वयींनी चव्हाण सेंटरचा हा पुरस्कार स्वीकारला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी श्री. शरद पवार आणि डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते डॉ. अभय बंग लिखित ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या मराठी पुरस्काचा अनुवाद असलेल्या ‘My Enlightening Heart Disease’ चे प्रकाशन करण्यात आले. सरचिटणीस हेमंत टकले यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले.

याप्रसंगी निवड समितीचे सदस्य श्री. विवेक सावंत, तसेच चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, चव्हाण सेंटरचे याप्रसंगी सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, विश्वस्त दिलीप वळसे पाटील, जीवनराव गोरे, बी.के.अगरवाल, जयराज साळगावकर, फरीदा लांबे, माजी महापौर विधी सल्लागार निर्मला सामंत-प्रभावळकर, प्रकाशक रामदास भटकळ उपस्थित होते. दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news