

गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात विहित मुदतील ई पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले असून, त्यासाठी १७ डिसेंबरपासून अर्ज करता येणार आहे.
अनेक शेतकऱ्यांना विहित मुदतीत ई पीक पाहणीची सातबारावर नोंद करता आली नाही. त्यामुळे शासनाने १४ डिसेंबरला परिपत्रक काढले असून, आता वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑफलाईन पाहणीची नोंद करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी १७ ते २४ डिसेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याकरिता तलाठ्याकडे अर्ज सादर करुन अर्जाची पोहोच घ्यावी. त्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची ग्रामस्तरावर स्थापन केलेली समिती २५ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करेल.
सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन ही समिती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील उपविभागीयस्तरीय समितीला आपला गावनिहाय अहवाल सादर करेल. उपविभागीय समिती अहवालाची खात्री करुन व काही हरकती असल्यास फेरचौकशी करुन अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. पुढे जिल्हाधिकारी हा अहवाल राज्य शासनास सादर करतील. ही संपूर्ण प्रक्रिया १५ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची सातबारावर पीक पाहणीची नोंद झालेली नाही; अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या तलाठ्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे यांनी केले आहे.