

Gadchiroli Leopard rescue operation
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील येडापूर गावात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या बिबट्याने एका घरात एन्ट्री केली आणि तो चक्क बाथरुममध्ये घुसला. घरची मंडळी भयभीत झाली. पाहता पाहता वार्ता गावभर पसरली. वनविभागाची चमूही घटनास्थळी दाखल झाली आणि मग साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
कुरखेडा तालुक्यातील येडापूर येथील नागरिकांनी हा थरार अनुभवला. सोमवारी (दि. २९) दुपारी ४ वाजता अचानक गावात बिबट्या आला. त्यानंतर तो सुखदेव कवडो यांच्या घरातील बाथरुममध्ये घुसला. बिबट्याला पाहताच कवडो कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी आरडाओरड करताच गावकरी धाऊन आले. त्यांनी पुराडा वनपरिक्षेत्र कार्यालयाला कळविले.
त्यानंतर सहायक वनसंरक्षक जोजिन जॉर्ज, सहायक वनसंरक्षक रवींद्र सूर्यवंशी, वनपरिक्षेत्राधिकारी रवी चौधरी, कुरखेडाचे वनपरिक्षेत्राधिकारी लक्ष्मीकांत गोपुलवाडा, क्षेत्रसहायक नंदकुमार पोले, संजय कंकलवार, अमोल राऊत, तसेच कुरखेडा, पुराडा, मालेवाडा, देलनवाडी, वडसा येथील वनकर्मचारी पिंजरा घेऊन आले. त्यांनी साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर रात्री साडेसात वाजता बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर कवडो कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर त्याला आज नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.