

गडचिरोली : येथील भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचे शुक्रवाी रात्री १० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील कारगिल चौकात झालेल्या अपघातात निधन झाले. यामुळे राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
श्री. काटवे हे शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाजार चौकातील आपल्या घराकडे जात असताना वाटेत डुकर आडवा आल्याने ते खाली कोसळले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रचंड रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भाजपसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
मुक्तेश्वर काकडे हे यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा ते निवडून आले. त्यानंतर ते नगर परिषदेचे आरोग्य सभापती झाले. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे गडचिरोली शहरावर शोककळा पसरली आहे.