

Shweta Kowe gold medal
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता कोवे हिने दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन युथ प्यारा गेम्समध्ये 'पॅरा आर्चरी' या क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्वेता कोवे हिने उत्कृष्ट कौशल्य, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासोबतच तिने मिक्स प्रकारात कांस्यपदक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
ग्रामीण व आदिवासीबहुल आष्टी येथील खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, यामुळे महात्मा फुले महाविद्यालय आणि गोंडवाना विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. श्वेताला डॉ.श्याम कोरडे यांनी प्रशिक्षण दिले.
या कामगिरीबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, क्रीडा संचालक डॉ.अनिता लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.