

Gadchiroli Local Body Elections
गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.६) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसदर्भात दिलेल्या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, १२ पंचायत समित्या आणि ३ नगर परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, १२ पंचायत समित्या आणि ३ नगर परिषदा, तर ९ नगर पंचायती आहेत. नगर पंचायतींची निवडणूक २०२१-२२ मध्ये झाली होती. त्यामुळे सर्व नगरपंचायतींवर लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. मात्र, गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर परिषदांची मुदत जानेवारी २०२२ मध्ये तर आरमोरी नगर परिषदेची मुदत फेब्रुवारी २०२५ मध्ये संपली आहे. त्यामुळे या तिन्ही नगर परिषदांची निवडणूक होणार आहे.
गडचिरोली नगर परिषदेत सध्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह २५, देसाईगंज नगर परिषदेत नगराध्यक्षांसह १८, तर आरमोरी नगर परिषदेत १८ नगरसेवक होते. या सर्वांची निवडणूक होणार आहे. अलीकडेच राज्याच्या मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केवळ नगरसेवकांची निवडणूक होणार आहे. आरमोरी नगर परिषदेत ८ प्रभाग, देसाईगंजमध्ये ९ तर गडचिरोली नगर परिषदेत १३ प्रभागांमध्ये ही निवडणूक होईल, असा अंदाज आहे. या तिन्ही नगर परिषदांवर भाजपची सत्ता होती, हे येथे उल्लेखनीय.
गडचिरोली जिल्हा परिषदेत पूर्वी ५१ सदस्य होते. परंतु २०२२ मध्ये झालेल्या नव्या रचनेत ५७ सदस्यसंख्या प्रस्तावित करण्यात आली. शिवाय पंचायत समित्यांची संख्या १०२ वरुन ११४ प्रस्तावित करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०२३ मध्ये संपली आहे. त्यावेळी आदिवासी विद्यार्थी संघ आणि काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता होती.