

गडचिरोली : आज जगभरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा होत असताना एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली गावातील नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी चक्क नाल्यात उतरुन आंदोलन केले. आतापर्यंत तीन जणांचे जीव घेणाऱ्या या पुलाऐवजी नवा पूल न मंजूर केल्यास तेथेच आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
मरपल्ली येथे रहिवासी तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रज्वल नागुलवार यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी हे आंदोलन केले. आदिवासीबहुल असलेले मरपल्ली हे गाव एटापल्ली या तालुकास्थळापासून अगदी जवळ आहे. परंतु मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. जमिनीला टेकल्यागत असलेल्या पुलावर मागील तीन वर्षांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना आवागमन करताना अधिकच त्रास होत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासन तसेच जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चाही करण्यात आली. मात्र, नवा पूल मंजूर करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज गावकऱ्यांनी नाल्यातील कंबरभर पाण्यात उतरुन प्रशासनाचा निषेध केला.
या आंदोलनात भूमिया फकरी रापंजी, बम्मा रापंजी, किशोर मज्जी, शिवाजी लेकामी,मधुकर रापंजी, सत्तू पुंगाटी, मनिष हेडो, करण हेडो, करण हलामी, मोतीराम गावडे, मधुकर मितलामी, नीलेश लेकामी, रमेश बावणे, सुधाकर रापंजी, लालू लेकामी, गणेश कुळयेटी, अभिजित सिडाम, बाडू लेकामी, नरेश लेकामी, विलास हिचामी यांच्यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.
मग, जिल्हा खनिकर्म निधीचा काय उपयोग?
एटापल्ली तालुका खनिज प्रकल्प बाधित तालुका आहे. तालुकास्थळापासून जवळ असलेल्या गावातील पूल खचल्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चाही केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. ६६६ कोटी रुपयांच्या जिल्हा खनिकर्म निधीतून नव्या पुलासाठी अवघे ५ कोटी रुपये दिले जात नसतील, तर काय उपयोग, असा प्रश्न प्रज्वल नागुलवार यांनी उपस्थित केला. येत्या १० दिवसांत पुलाच्या मंजुरीचा आदेश मिळाला नाही, तर पुलावरच उपोषणाला बसण्याचा इशारा प्रज्वल नागुलवार यांनी दिला.