

गडचिरोली : वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि ८ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांनी आज जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखील दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. रामसू दुर्गू पोयाम उर्फ नरसिंग (५५) व रमेश शामू कुंजाम उर्फ गोविंद उर्फ रोहित(२५) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.
रामसू पोयाम हा धानोरा तालुक्यातील गट्टानेली येथील रहिवासी आहे. मागील ३२ वर्षांपासून तो नक्षल चळवळीत कार्यरत होता. १९९२ तो टिपागड दलममध्ये भरती झाला. त्यानंतर बराच काळ त्याने छत्तीसगडमध्ये घालवला. सध्या तो नक्षल्यांच्या एरिया कमिटी मेंबर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ६ चकमकी, ५ खून आणि १ दरोडा असे १२ गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
रमेश कुंजाम हा छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील वेडमेट्टा येथील रहिवासी आहे. २०१९ पासून त्याने मिलिशिया म्हणून नक्षल्यांची कामे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो चेतना नाट्य मंचचा सदस्य झाला. २०२१ पासून तो छत्तीसगडमधील कुतुल दलमचा सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याचा कोणत्या हिंसक कारवायांमध्ये सहभाग आहे, याविषयी पोलिस चौकशी करीत आहेत. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६८० नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
विशेष पोलिस महानिरीक्षक(नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल,केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे समादेशक सुजितकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.