

Gadchiroli tiger attacks issues
गडचिरोली : इंजेवारी-देऊळगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक ठार झाले आहेत. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करावा,शेतकऱ्यांना वाघापासून संरक्षण द्यावे, रानटी हत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेत वाढ करावी या व इतर मागण्यांसाठी शनिवारी (दि.६) आरमोरी-गडचिरोली मार्गावरील देऊळगाव येथे आमदार रामदास मसराम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात ठिय्या व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात गेल्या २० दिवसांत वाघाच्या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सलग वाढणाऱ्या हल्ल्यांनंतरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
या गंभीर परिस्थितीत आमदार रामदास मसराम व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात आज देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेस नेते मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार, सागर वाढई, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक, आजाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, सोनाशी लभाने याच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच परिसरातील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संतप्त नागरिकांनी तब्बल दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोषणाबाजी, प्रशासनावरील रोष आणि ठोस कारवाईची मागणी असे वातावरण आंदोलनादरम्यान पाहायला मिळाले.