

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील दोलंदा येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हरी बोहरन वड्डे(५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली.
हरी वड्डे हे सकाळी गावाबाहेरील जंगलात शौचास गेले होते. परंतु बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतेदह आढळून आला. वाघाने हल्ला करुन वड्डे यांना काही अंतरावर फरफटत नेल्याचे दिसून आले. पोलिस आणि वनपालांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मागील काही दिवसांपासून जारावंडी परिसरातील गावांमध्ये वाघाचा वावर आहे. यापूर्वी वाघाने पाळीव जनावरांना लक्ष्य केले होते. परंतु आता मनुष्यावरही हल्ले सुरु झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
१८ ऑगस्टला चक्काजाम आंदोलनाचा इशारा
सामाजिक कार्यकर्ते मुकेश कावळे यांनी १८ जुलैला वनाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने १८ ऑगस्टला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कावळे यांनी दिला आहे. घटना सकाळी घडली असतानाही वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी पोहचले नाही आणि त्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदतही केली नाही, याबद्दल कावळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.