

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. समाजकल्याण विभागाच्या तीन ठिकाणच्या निवासी शाळांमधील १२० विद्यार्थ्यांनी विमानप्रवासाद्वारे बंगळूरु येथील इस्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी उड्डाण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
समाजकल्याण विभागाद्वारे संचालित सिरोंचा, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली आणि गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील निवासी शाळांचे हे विद्यार्थी आहेत. हे सर्वजण इस्त्रोला भेट देऊन उपग्रह, रॉकेट, अवकाश तंत्रज्ञान याविषयीची माहिती जाणून घेणार आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांनीही विमानतळावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी गडचिरोली येथून या विद्यार्थ्यांना बसद्वारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर विमानतळावर रवाना करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी चेतन हिवंज उपस्थित होते. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडली होती. जिल्हाधिकारी पंडा यांनी त्यास तत्काळ मंजुरी दिली. तसेच मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केला होता.