

Gadchiroli Sironcha Heatwave
गडचिरोली : यंदाच्या कडक उन्हाचा फटका पक्ष्यांसह सस्तन प्राण्यांनाही बसू लागला आहे. उष्माघातामुळे सिरोंचा येथे अनेक वर्षांपासून वस्ती असलेल्या जवळपास ५०० वटवाघळांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सिरोचा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या वनविभागाच्या विश्रामगृहाचा परिसर हा ब्रिटीशकाळापासून वटवाघळांचे वसतिस्थान आहे. तेथे चिंचेची ३ झाडे आहेत. शेकडो वटवाघळे दिवसभर झाडांच्या फांद्यावर लटकलेली दिसतात. परंतु यंदा मे महिन्यात प्रचंड उन्ह वाढल्याने वटवाघळे उष्माघाताला बळी पडत आहेत. शुक्रवारी २२ मे रोजी सिरोंचा शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअस होते. हे तापमान वटवाघळे सहन करु शकली नाही. परिणामी शेकडो वटवाघळे झाडाखाली मृतावस्थेत आढळून आली, तर काही वटवाघळे झाडावरच लटकलेल्या अवस्थेत आढळली.
शेकडो वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे कळताच वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.केतन पेदापल्ली यांना पाचारण केले. वटवाघळांना रॅबीज व निपाह विषाणूजन्य आजार होतात आणि मानवास त्यांचा संसर्ग झाल्यास मानवाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे उचित काळजी घेऊन मृत वटवाघळांना त्याच परिसरात दफन करण्यात आले. दोन्ही आजारांची कुठलीही लक्षणे वटवाघळांमध्ये दिसली नाही. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉ.केतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला. आता त्या परिसरात वटवाघळांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सुरपाम यांनी सांगितले. जवळपास ४५० ते ५०० वटवाघळे मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी दिली
वटवाघूळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. सस्तन प्राण्यांच्या प्रजातींपैकी २० टक्के संख्या असलेल्या वटवाघळांच्या जगभरात १५०० प्रजाती आढळतात. जैवविविधता टिकवून ठेवण्यात वटवाघुळे महत्वाची भूमिका पार पाडतात. दिवसभर झाडावर दिसणारी वटवाघळे रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. विविध फळे, परागकण आणि कीटकांवर ते उपजीविका करतात. फुलांचे परागीकरण, बियांचे प्रसारण आणि कीटक नियंत्रणामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते. यामुळे जंगलाचे संवर्धन होण्यास मदत होते.
साधारणत: हजारो वटवाघळे एकत्रित राहतात. काळा रंग असल्याने ते लवकर उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने पुरेसे आणि वेळेवर पाणी न मिळाल्यास वटवाघळे मृत्यूमुखी पडू शकतात.