Gadchiroli News : पदावरुन गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी केली शिवसेना कार्यालयाची तोडफोड

तोडफोड केल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त
Gadchiroli News : पदावरुन गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी केली शिवसेना कार्यालयाची तोडफोड
Gadchiroli News : पदावरुन गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी केली शिवसेना कार्यालयाची तोडफोड
Published on
Updated on

गडचिरोली,: शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन गच्छंती झाल्याने संतापलेले माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी शिवसेना जिल्हा कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना आज गडचिरोलीत घडली. या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी(ता.११) मुंबई येथे माजी खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वासुदेव शेडमाके यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांची गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रांचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून दिलीप सुरपाम यांना संधी देण्यात आली, तर डॉ.श्रीकांत बन्सोड यांना जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख बनविण्यात आले.

यामुळे दुखावलेले वासुदेव शेडमाके हे आज दुपारी आपल्या सहकाऱ्यांसह गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील शिवसेना जिल्हा कार्यालयात गेले. त्यांनी तेथील प्लॉस्टर ऑफ पॅरिसची तोडफोड केली. विद्युत बोर्ड व अन्य सामानही काढून घेतले. त्यानंतर जिल्हाप्रमुख पवन गेडाम आले. त्यांनी शेडमाके यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकायला तयार नव्हते. काही वेळाने माजी जिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार आले. त्यांनी 'तुम्ही शिवसेना कार्यालयाची तोडफोड करीत आहात काय?' असा प्रश्न विचारुन शेडमाके यांच्या सहकाऱ्यांना दम दिला. त्यामुळे पुढील तोडफोड थांबविण्यात आली. पुन्हा संध्याकाळी शेडमाके हे शिवसेना कार्यालयात जाऊन वातानुकूलीत यंत्र, खुर्च्या, टेबल, पंखे इत्यादी सामान घेऊन गेले.

दुपारी नवनियुक्त शिवसेना जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी वासुदेव शेडमाके व गणेश धोटे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली. यासंदर्भात विचारणा केली असता 'तक्रार प्राप्त झाली' एवढेच पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वासुदेव शेडमाके हे खरंच निष्ठावंत शिवसैनिक असतील तर त्यांनी कार्यालयातील आपले सामान घेऊन जायला हवे होते; परंतु पीओपी व अन्य बाबींची तोडफोड करणे कुठल्या निष्ठेला शोभते, असा सवाल शिवसैनिक विचारु लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news