

Range Forest Officer Caught Gadchiroli
गडचिरोली : अवैध सागवान लाकडे सापडल्यानंतर फर्निचर विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठविण्यासाठी एका फर्निचर व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यक्तीसह वनपरिक्षेत्राधिकारी व वनरक्षकास रंगेहाथ पकडले.
श्रीनिवास कटकू (वय ५२) (वनपरिक्षेत्राधिकारी), नीतेश मडावी (वय ३७) (वनरक्षक) व प्रदीप मंडल (वय ५०) (खासगी व्यक्ती ) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही वनकर्मचारी हे मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कार्यरत आहेत. तक्रारकर्ता हा फर्निचर व्यावसायिक असून, अवैध सागवान लाकडे बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर ११ जूनला वनगुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, फर्निचर विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठविण्यासाठी १७ जूनला वनरक्षक मडावी याने वनपरिक्षेत्राधिकारी कटकू यांच्या सांगण्यावरुन फर्निचर व्यावसायिकास लाच मागितली. दुसऱ्या दिवशी वनपरिक्षेत्राधिकारी कटकू यांनी स्वत: तक्रारकर्त्यास ३ लाख रुपयांची लाच मागितली आणि पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये प्रदीप मंडल याच्याकडे देण्यास सांगितले.
परंतु, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता संबंधितांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
पुढे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गणेशपूर-मुलचेरा मार्गावर सापळा रचला असता वनपरिक्षेत्राधिकारी कटकू व वनरक्षक मडावी यांच्या वतीने खासगी व्यक्तीला फर्निचर व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. एसीबीचे उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण बगाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.