

गडचिरोली : सेप्टीक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून कंत्राटदाराकडून दीड लाख रुपये लाचेची मागणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिकाने केली. यापैकी ५४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरच्या रात्री गुन्हा दाखल केला आहे. विक्की भास्कर प्रधान (३०) असे लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हा सफाई कंत्राटदार असून, त्याने पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय व अन्य ठिकाणच्या सेप्टीक टाक्यांच्या सफाईचे काम घेतले होते. या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून पोलिस अधीक्षक कार्यालयातील इमारत शाखेचा लिपिक विक्की प्रधान याने कंत्राटदारास दीड लाख रुपयांची लाच मागितली.
प्रधान याने आधी दोन टप्प्यांत ५४ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्याने कंत्राटदारास फोन करुन ५४ हजार रुपये प्राप्त झाल्याचे कबूल केले. मात्र, उर्वरित ९६ हजार रुपयांची मागणी करुन त्या रकमेपैकी १० हजार रुपये आणून देण्यास सांगितले.
यासंदर्भात कंत्राटदाराने २४ ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने ८ नोव्हेंबरला सापळा लावला होता, परंतु संशय आल्याने विक्की प्रधान याने लाच स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याच्या आरोपावरुन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरला विक्की प्रधान यास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधिक कायद्यानुसार गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एसीबीचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, अंमलदार सप्नील बांबुर्डे, संदीप घोनमोडे, संदीप उडाण, राजेश पद्मगिरवार, ज्योत्सना वसाके, विद्या मशाखेत्री, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.