Gadchiroli News : हिरापूरच्या विद्यार्थ्यांनी टाकला शाळेवर बहिष्कार, जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर चिमुकल्यांची नाराजी

पहिल्याच दिवशी शाळा पडली ओस
Gadchiroli News : हिरापूरच्या विद्यार्थ्यांनी टाकला शाळेवर बहिष्कार, जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर चिमुकल्यांची नाराजी
Published on
Updated on

गडचिरोली : जिल्हाभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना आज हिरापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेवरच बहिष्कार टाकला. पालकांचा प्रचंड विरोध असतानाही सरकार शेतजमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया करीत असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याने शाळा ओस पडल्याचे दिसून आले.

आज विद्यार्थी शाळेच्या वेळेपूर्वीच शाळेच्या प्रवेशद्वारासमोर गणवेशातच एकत्र आले. त्यांनी शाळेसमोर ठिय्या दिला. सोबत अनेक पालकही होते. शिक्षकांनी रांगोळ्या घालून, बँडवाजा, गुलाबपुष्प आणून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्याचे ठरविले होते. परंतु पालक आणि विद्यार्थ्यांची भूमिका लक्षात घेता शिक्षकांच्याही आनंदावर विरजण पडले. प्रवेशोत्सवासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे एक कार्यकारी अभियंता शाळेला भेट देण्यासाठी आले होते. परंतु विद्यार्थी आणि पालकांची भूमिका लक्षात घेता त्यांनाही प्रवेशोत्सव न घेताच परत जावे लागले.

कशामुळे घेतला विद्यार्थ्यांनी हा निर्णय?

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर परिसरात विमानतळ उभारण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी हिरापूर, गुरवळा, राखी, शिरपूर इत्यादी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया शासनाने सुरु केली होती. परंतु ४ जूनला हजारो स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले.

त्यावेळी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन १२ मे २०२६ च्या विमानतळ निर्मितीसंदर्भात कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु या बाबीला महिनाही होत नाही;तोच शासनाने विमानतळासाठी वनजमिनीतून महसूल मिळविण्याच्या हेतूने सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढली आहे.

२ जुलैला ही निविदा उघडण्यात येणार आहे. याचा अर्थ पडद्यामागून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया केली जात आहे. ही प्रक्रिया अन्यायकारक असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतल्याचे हिरापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिवाकर निसार यांनी सांगितले. हीच भूमिका अन्य गावकऱ्यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news