Gadchiroli News | ‘केमिकल लोचा!’: अभियंत्यांनी उलगडले 'त्या' विहिरीतील गरम पाण्याचे रहस्य
गडचिरोली :अहेरी तालुक्यातील ताटीगुडम येथील एका खासगी विहिरीतून गरम पाणी येत असल्याची वार्ता पंचक्रोशीत पसरल्यानंतर त्याविषयीचे गूढ उकलण्यात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना यश आले आहे. विहिरीच्या आतील भागात असलेल्या चुनखडकावर झालेल्या रासायनिक अभिक्रियेमुळे पाणी गरम झाल्याचा निष्कर्ष अभियंत्यांनी काढलेला आहे.
कमलापूर ग्रामपंचायतींतर्गत ताटीगुडम येथील सत्यन्ना मलय्या कटकू यांच्या खासगी विहिरीतून अचानक गरम पाणी येत असल्याचे ८ सप्टेंबरला निदर्शनास आले. पाहतापाहता ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने ताटीगुडम येथे जाऊन विहिरीची पाहणी केली. सत्यन्नाच्या घरी असलेली विहीर सुमारे २० वर्षे जुनी आहे. तिचा व्यास १.३० मीटर व खोली ७.८० मीटर आहे. सहा महिन्यांपूर्वी या विहिरीतील गाळ उपसण्यात आला तेव्हा तेथे चुनखडकाचा थर लागला होता. पाण्याची तपासणी केली तेव्हा त्यात पांढरे कण आढळले. शिवाय सबमर्सिबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसून आले. परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला असता येथे चुनखडक असल्याचे निष्पन्न झाले.
म्हणून झाले विहिरीतील पाणी गरम
सहा महिन्यांपूर्वी ताटीगुडम येथील विहिरीतील गाळाचा उपसा करण्यात आला तेव्हा जमिनीतील चुनखडकातील कॅल्शिअम ऑक्साइडशी पाण्याचा संपर्क आला. या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिॲक्शन) होऊन कॅल्शिअम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी, विहिरीतील पाणी गरम झाले. या विहिरीसह जवळचे सार्वजनिक हातपंप व अन्य घरगुती विहिरींच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. संबंधित विहिरीतील पाण्यात कॅल्शिअम कार्बोनेटची मात्रा ९२३ मिलिग्रॅम प्रती लिटर असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाणी गरम झाले, असा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी सांगितले.

