ChatGPT Exam Cheating : बाप रे! गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत 'चॅट जीपीटी'ने कॉपी; केंद्र संचालकासह चौघांवर गुन्हे दाखल

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील घटनेने खळबळ
ChatGPT Exam Cheating : बाप रे! गडचिरोलीत बारावीच्या परीक्षेत 'चॅट जीपीटी'ने कॉपी; केंद्र संचालकासह चौघांवर गुन्हे दाखल
Published on
Updated on

गडचिरोली : कॉपी बहाद्दरांनी आता थेट 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (AI) आधार घेतल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बारावीच्या परीक्षेत चॅट जीपीटीद्वारे (Chat GPT) उत्तरे शोधून ती विद्यार्थ्यांना पुरवणाऱ्या एका टोळीचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चामोर्शी येथील परीक्षा केंद्र संचालकासह चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सीईओंची अचानक भेट अन् 'हायटेक कॉपी' पकडली

चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारी रोजी बारावीचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू होता. याच दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी (CEO) सुहास गाडे यांनी केंद्राला अचानक भेट दिली. साहेबांची गाडी पाहताच केंद्रावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गाडे यांनी थेट कार्यालयात जाऊन तपासणी केली.

प्रिंटरवरून थेट उत्तरांच्या प्रिंट

तपासणीदरम्यान असे आढळून आले की, केंद्रावरील कर्मचारी चॅट जीपीटी या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधत होते आणि त्यांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्याची तयारी सुरू होती. हा प्रकार पाहून खुद्द अधिकारीही अवाक झाले. शिक्षणाची पवित्र मंदिरेच अशा हायटेक कॉपीचे अड्डे बनत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

या कर्मचाऱ्यांवर झाली कारवाई

गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारवाई झालेल्यांमध्ये महेंद्र बुर्लावार (केंद्र संचालक), सुशील लांजेवार (पर्यवेक्षक), महेंद्र किरमे (शिक्षक), सूरज केळझरकर (शिपाई) यांचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

परीक्षेतील 'एआय'चा गैरवापर चर्चेत

तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होण्याऐवजी तो कॉपीसाठी केल्या जात असल्यामुळे जिल्हा शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news