

गडचिरोली : नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भामरागड दलमची सदस्य असलेल्या तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दस्सा कुळमेथे (२८) या नक्षल महिलेने आज गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले.
तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दस्सा कुळमेथे ही अहेरी तालुक्यातील नैनेर येथील रहिवासी आहे. २०१६ मध्ये ती अहेरी दलममध्ये भरती झाली. पुढे २०१८ मध्ये तिची बदली भामरागड दलममध्ये झाली. आजतागायत ती तेथे कार्यरत होती.
८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. २०१६ मध्ये कवठाराम, २०१७ मध्ये शेंडा-किष्टापूर आणि आशा-नैनेर, २०१९ मध्ये मोरमेट्टा, २०२० मध्ये आलदंडी व येरदळमी, २०२१ मध्ये छत्तीसगडमधील काकूर आणि २०२३ मध्ये हिक्केर जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. शिवाय २०२१ मध्ये कोठी, २०२३ मध्ये मिळदापल्ली आणि २०२४ मध्ये ताडगाव येथील एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. शिवाय २०२२ मध्ये कापेवंचा-राजाराम खांदला येथील दरोड्यातही ती सहभागी होती, असे पोलिसांनी सांगितले. राज्य शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या बटालियन-९ चे कमांडंट शंभूकुमार, उपकमांडंट सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनात आत्मसमर्पणाची कारवाई पार पडली.
२००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७८, तर २०२२ पासून ३१ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिेंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे,असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.
२ डिसेंबर २००० रोजी नक्षल्यांनी पीपल्स लिबरेशन गुर्रिल्ला आर्मी या सशस्तर संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबर या कालावधीत पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या कालावधीत ते हिंसक कारवाया करतात. परंतु पीएलजीए सप्ताहाच्या आजच्या पहिल्या दिवशी कुठेही अनुचित घटना घडली नाही. दुर्गम भागातील वाहतूक आणि बाजारपेठा सुरळीत सुरु होत्या, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.