गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम (वय ४२) याने आज (दि. ३०) पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
केदार नैताम हा धानोरा तालुक्यातील कोसमी क्रमांक १ येथील रहिवासी आहे. २००२ मध्ये तो टिपागड दलममध्ये भरती झाला. २००७ पासून तो उत्तर गडचिरोली विभागाच्या तांत्रिक समितीचा सदस्य झाला. २०१२ पासून २०२० पर्यंत तो प्लाटून क्रमांक १५ मध्ये कार्यरत राहिला. त्यानंतर त्याची एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती झाली. सध्या तो पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य म्हणून काम पाहत होता. (Gadchiroli News)
त्याच्यावर चकमकीचे १८, जाळपोळीचे ३, खुनाचे ८ आणि अन्य ६ अशा एकूण ३४ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. २०२२ पासून आतापर्यंत २५, तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६७३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.