

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या अत्यंत क्लिष्ट खून प्रकरणाची गडचिरोली पोलिसांनी यशस्वीरीत्या उकल केली आहे. जुन्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी संदीप रावजी टेकाम (वय ३५, रा. नारायणपूर चक क्र. २, ता. चामोर्शी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
५ सप्टेंबर रोजी गोपिकाबाई रामचंद्र गायकवाड या शेतात गेल्या होत्या. संध्याकाळपर्यंत त्या घरी परत न आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी शेतात त्यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि घोट पोलिस मदत केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान सहायक पोलीस अधीक्षक हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण केले. जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या दिशेने तपास करताना पोलिसांनी मयत महिलेचे कौटुंबिक संबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संदीप टेकाम याच्यावर संशय घेतला.
चौकशीत जुना वाद आणि पूर्ववैमनस्यातून गोपिकाबाईवर काठीने मारहाण आणि दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी संदीप टेकाम याला अटक करण्यात आली. चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि घोट येथील तपास पथकाचे कौतुक केले आहे.